आमीर, सत्यमेव जयते आणी अफवा


आमीर, सत्यमेव जयते आणी अफवा

     सोशल मिडिया हातात आल्यापासून प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पेव फुटलंय. चौकात सभा असल्यावर किंवा मिटींगमध्ये दोन शब्द बोल म्हंटल्यावर बोबडी वळणारे महाभाग सुद्धा फेसबुकवर दोन-दोनशे शब्द टंकू लागले, यातही जहाल विचारसरणीच्या वैगेरे पोस्टचाच भरणा अधिक. एखादी नवीन पोस्ट मार्केटमध्ये आली की सत्य-असत्यतेशी काही घेण-देणं न ठेवता २५-२५ भिंतींवर ते डकवून मोकळे होणारे. फेसबुकवर असे प्रकार डोळ्यासमोर होत असल्यामुळे ते इतरांना दिसते, पण व्हाट्स एप सारख्या पिल्लामुळे मागच्या गोष्टी पडद्याआडच राहतात, आणी चुकीची माहिती शेकडो, हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचत राहते, वेळोवेळी अशा पोस्ट जर आपल्याला आढळल्या तर त्या केवळ हाईड किंवा रिपोर्ट न करता तिथल्या तिथे वस्तुस्थिती दर्शवत खोडून काढायला हव्यात, तरच अशा पोस्टमार्फत होणारा अपप्रचार टळू शकतो. माझ्या मते ह्या अशा पोस्टपेक्षा “लाईक करो, कमेंट करो और आपकी मन्नत दस मिनिट में पुरी होगी” किंवा "एक लाईक करो और फेसबुक अमुक-तमुक को १ डॉलर की मदद करेगा” आणी बरोबर तसल्याच प्रकारचा एखादा हृदयद्रावक फोटो अशा पोस्ट कधीही परवडल्या, कारण अशा पोस्टमुळे भावनांशी तथाकथित खेळ होत असला तरीही विषय तिथल्या तिथे संपतो पण शेवटी अशा गोष्टीसुद्धा दो से भला एक और एक से भला शून्य च्या वेगाने का होईना पण कमी व्हाव्यात.
      असो, आजपासून आमीर भाऊंची सत्यमेव जयते ह्या मालिकेचे दुसरे पर्व सुरु होत आहे, आणी फेसबुकवरचे तोतया धर्म प्रचारक कामाला लागले आहेत, यांच्या पोस्ट सुद्धा एकापेक्षा एक असतात, राग येण्यापेक्षा कीव आणी हसूच अधिक येते. कोणताही सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेला माणूस ह्यांच्या पोस्टस वर विश्वास ठेवणार नाही पण इतरांचे काय? थेट धार्मिक भावनेला हात घालून काहीही टंकले की ते ह्या लोकांच्या सहज पचनी पडते म्हणूनच धर्मांध तोतयांचे फावते. तुम्हीही कदाचित अशा आशयाच्या पोस्ट वाचल्या असतील. सत्यमेव जयते बद्दलसुद्धा अशीच एक पोस्ट सगळीकडे फिरत आहे (माझ्या नजरेत तरी एकच आलीय.. फिल्टर्स मुळे बहुदा) म्हणे आमीर फक्त मुस्लीम संस्थांनाच पैसे देतो, ज्यामुळे देश विदेशात मशिदी बांधल्या जातात, मुस्लीम तरुणांना नोकऱ्या लावल्या जातात, हिंदूंनी या शोचा निषेध करावा, म्हणजे टी.आर.पी कमी होईल वैगेरे वैगेरे.. कहर म्हणजे बरोबर HUMANITY TRUST च्या संदर्भात लिहिले होते आणी बरोबर त्या वेबसाईटचा दुवा होता (आज ती वेबसाईट डिझाईन सोडली तर बंदच आहे) आणी त्याबरोबर लिहिले होते विश्वास नसेल तर बघा, याचे बहुतांश बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मुस्लीम आहेत (इथे मात्र जे पंतप्रधानाही सहजासहजी शक्य नाही तो पराक्रम केला, ट्रस्ट मधून ट्रस्टींना हाकलून त्याजागी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणून बसवले)

     बाकीचे राहुदे बाजूला मुळात सत्यमेव जयतेने या संस्थेला मदत केलीच नाही आहे, आणी हे खुद्द त्या संकेतस्थळावर लिहिलेले होते. सत्यमेव जयतेच्या संकेतस्थळावर ज्या HUMANITY TRUST चा उल्लेख आहे ती संस्था पश्चिम बंगाल मधील हंसपुकुर गावात रुग्णालय चालवते ज्याची सुरुवात श्री.अजय मिस्त्री आणी त्यांच्या मातोश्री श्रीमती.सुभासिनी मिस्त्री यांनी १९९३ साली केली आणी आजतागायत रुग्णसेवेचे व्रत सुरु ठेवले आहे, त्यांची संपूर्ण कहाणी वाचण्यासारखी आहे ती संस्थेच्या वार्षिक अहवालात मिळेल (अहवालासाठी इथे टिचकी द्या).

     अहमदनगरची स्नेहालय, डॉ.अनिल अवचट यांची मुक्तांगण मित्र सारख्या आपल्याला परिचित संस्था सोडल्या तर याशिवाय अशाच प्रकारे समाजसेवा करणाऱ्या संभावना ट्रस्ट, मैत्री, प्रज्वला, आझाद फाउंडेशन, चाईल्ड लाईन सारख्या एकूण १५ संस्थांना लाखांपासून करोडोंपर्यंत या कार्यक्रमाद्वारे मदत केली गेली. फक्त मुस्लिमांसाठी (किंवा एखाद्या विशिष्ट धर्मासाठी) काम करणाऱ्या कोणत्याही संस्थेला आजतागायत सत्यमेव जयतेद्वारे मदत केली गेली नाही, जे निश्चितच स्वागतार्ह आहे. संस्थांकडून सर्व धर्मियांना (म्हणजेच आपल्या देशाला) लाभ होत आहे, होत रहावा आणी होत राहील.. त्यामुळे सत्यमेव जयतेविषयकच नव्हे तर इतर कोणत्याही विषयाबद्दल भरकटवणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवण्याआधी त्याबाबत स्वतः पडताळणी करा (गुगल झिंदाबाद) याच संदर्भात असलेली आयडियाची जाहिरात आठवली (नो. उल्लू बनाविंग)..

     आमीर आणी त्याची टीम एक प्रकारे करत असलेली देशसेवा किंवा लोकप्रियता एखाद्याला खुपत असावी किंवा इतरही काही कारणे असतील म्हणून धर्माचे लेबल लाऊन देशविघातक पोस्ट्स डकवण्याचे काम ही मंडळी करत असावीत, तेव्हा पुढच्या वेळी अश्या पोस्ट दिसल्या तर दुर्लक्ष करण्याएवजी तिथल्या तिथे वस्तुस्थिती असलेल्या मुद्यांसह खोडून काढा, आणी हो, जिन्हे देश की फिक्र है त्यांनी आमिरचा हा कार्यक्रम जरूर बघा कारण सत्यमेव जयते.. यावेळेस मराठीमधुनही.. 
आमीर भाऊंना मनपूर्वक शुभेच्छा..


बाह्य दुवे
३) HUMANITY TRUST नावाने कार्यरत दुसर्या संस्थेचे पत्रक
    (सत्यमेव जयतेशी संबंध नाही)

Being Curious

Being Curious

The important thing is not to stop questioning. Curiosity has its own reason for existing.
- Albert Einstein

उजळलेल्या प्रकाशवाटा

उजळलेल्या प्रकाशवाटा

जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥
तो चि साधु ओळखावा । देव तेथे चि जाणावा ॥
- तुका म्हणे